भामलवाडी येथे गटारी अभावी सांडपाणी रस्त्यावर, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील भामलवाडी येथे सन १९८१ पासून ते आजपर्यंत बेघर प्लॉट भागातील घरांजवळ गेल्या कित्येक वर्षापासून गटारी नसल्याने याभागात राहणाऱ्या ग्रामस्थांना दुर्गंधी युक्त सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्यामुळे चिखलातून येजा करावी लागते.
तसेच रहिवाश्यांच्या घराजवळच सांडपाण्याचे डबके साचले असल्यामुळे विषाणूजन्य आजारांना आमंत्रण मिळत आहे.तसेच डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.तसेच शेजाऱ्यांच्या अंगणात सांडपाणी गेल्याने आपआपसात भांडणे सुद्धा होत असतात त्यामुळे सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो कोणाचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे वेळीच स्थानिक प्रशासनाने लक्ष देवून बेघर प्लॉट भागात १०० फूट लांबीची नवीन गटार बांधण्यात यावी अशी मागणी भामलवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.