खिर्डी येथे मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट, वाहतूकीच्या कोंडीने वाहनचालक त्रस्त
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी येथील बाजारपेठ ते नवीन गावठाण परिसरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला असून वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते.रस्त्यावर गुरे, ढोरे, व शेळ्या मोकाट सोडून नागरिकांना व वाहतुकीला अडचण निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांविरुध्द ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तसेच नागरिकांसह वाहनधारकांची मात्र या समस्येपासून सुटका करण्यात ग्राम पंचायत प्रशासन कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने ग्राम पंचायत प्रशासन हतबल झाले की काय असा प्रश्न पडतो. तसेच रस्त्यावर मोकाट जनावरे व शेळ्या,फिरत असून रस्त्याच्या मध्यभागी थांबत असल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.तसेच अचानकपणे मोकाट जनावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तर वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने वाहन धारकांसह शेतकरी वर्ग ही संतप्त झाला आहे.तसेच ऐन सकाळच्या वेळेस तर अर्धा अर्धा तास वाहतूक व्यवस्था खोळंबत असून वाहन चालकांना अर्ध्याच रस्ताचा वापर करून ये जा करावी लागत असल्याने अपघात झाले आहेत.या गंभीर समस्येकडे ग्राम पंचायत प्रशासनातर्फे योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.