तांदलवाडी परिसरातील केळी पीकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी आर्थिक संकटात
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे,भिमराव कोचुरे। गेल्या चार पाच दिवसांपासून तांदलवाडी व परिसरातील केळी पट्टयात थंडीची बऱ्यापैकी चाहुल लागल्याने केळी बागांवर करपा (बुरशी) सदृश्य रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत.
अवेळी झालेला पाऊस ढगाळ वातावरण, आर्द्रता यामुळे व थंडीमुळे (बुरशी) करपा वाढतांना दिसत आहे. त्यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान होत आहे. पर्यायाने केळी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तांदलवाडीसह, मांगलवाडी, बलवाडी,सुनोदा,उदळी परिसरात नवती केळी बागांवर तसेच हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. केळी बागांमधील केळीच्या पानांवर लाल तांबूस आकाराचे छोटे मोठे ठिपके दिसू लागतात नंतर पान वाळून गडून पडते.गेल्या दोन ते तीन महीने झालेल्या पावसामुळे तसेच वातावरणातील आद्रतेमुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढतच आहे.येणाऱ्या काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढल्यास करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.मागील महिन्यात सी एम व्ही नंतर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने परिसरातील शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडले आहेत.