खिर्डी बु.! ग्रामपंचायत ने लाखो रुपये खर्च करून केलेल्या काँक्रीटीकरणाची नासधूस..!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन। MTM Newsnetwork
खिर्डी ता.रावेर (भिमराव कोचुरे)। येथील आंबेडकर नगरातील दलित वस्ती सुधार व इतर योजनेअंतर्गत गल्ली काँक्रीटीकरण नुकतेच करण्यात आले आहे. कॉंक्रिटीकरण करून एक वर्षाचा कालावधी ही उलटत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीकडून पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी काँक्रिटीकरण खोदून टाकण्यात आले. व रस्त्याचे विद्रुपीकरण केले गेले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेडकर नगरात ज्या ठिकाणी कॉंक्रीटीकरण करण्यात आलेले आहे तेथे टाकलेल्या पाण्याच्या पाईप लाईनला ३०-३५ वर्षाचा कालावधी उलटून ती जीर्ण झालेली आहे तसेच कमी प्रमाणात पाणी येते हे ग्रामपंचायत ला ठाऊक असताना देखील पाण्याची पाईप लाईन बदलवण्या ऐवजी ग्रामपंचायतीने प्रथम कॉंक्रीटीकरण केले त्यानंतर नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केलेले आहे. व रस्ता पूर्ण खराब करण्यात आला आहे तसेच पाईपलाईन साठी नालीवरील धापा फोडून पाईप टाकण्यात आलेली आहे परंतु काम पूर्ण झाल्यावर सुद्धा फोडलेला धापा व फोडलेले कॉंक्रिटीकरण पुन्हा काँक्रीटीकरण करून बुजलेले नाही. त्यामुळे गल्लीत खेळणारे लहान मुले व तसेच रात्री बेरात्री गल्लीतून ये-जा करणारे कामगार महिला व पुरुष यांचा धाप्याच्या छिद्रात पाय जाऊन दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तसेच लहान मुलं देखील ये – जा व खेळत असतांना एखादी लहान मुलांचा पाय धाप्याच्या छिद्रात गुंतून मोडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील तेथील रहिवाशांना पडला आहे.?सदरील बाबीकडे संबंधित वार्ड प्रतिनिधी व ग्रा.पंचायत समिती यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तसेच ग्रा.प. सदस्य यांचे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवासी तथा सामाजिक युवा कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी केला आहे.
प्रतिक्रिया:-१)
ग्रा.पंचायत खिर्डी बु.चा नियोजन शून्य कारभार आहे कुठलाही ताळमेळ नाही व ग्रा.वि.अधिकारी यांचे कुठेही गावाच्या विकासाबाबत नियोजन व आराखडा तयार नाही तसेच गावात नागरिकांच्या काय समस्या आहेत आरोग्य,पाणी,गटारी,घरकुल यासाठी आपण काय प्रयन्त करायला पाहिजे असे काहीही नाही. त्याचबरोबर याविषयी मौखीक माहिती व प्रश्न विचारली असता दुसऱ्या गावाचा पण अडीशनल चार्ज असल्याचे सांगून वेळ मारून जातात.
— विनायक जहुरे–सामाजिक कार्यकर्ते.
प्रतिक्रिया:-२)
नवीन पाईपलाईन साठी कॉंक्रिटीकरण फोडल्यानंतर पाईप लाईन टाकून झाल्यावर कॉंक्रिटीकरण करून रस्ता अद्यावत करणं गरजेचं होतं परंतु याकडे ग्रामपंचायतीने सर्रास दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार यातून निदर्शनास आलेला आहे. तसेच कॉंक्रिटीकरण देखील हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे कॉंक्रिटीकरनाच्या थराची जाडी ही अत्यंत कमी आहे त्यातच हा प्रकार ग्रामपंचायतीकडून झालेला आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे नितांत गरजेच आहे.– शिवदास कोचूरे