सावद्यात “लम्पि” आजारात सुद्धा भरतोय मोठा गुरांचा बाजार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला “खो”
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात गुरांवर लम्पिच्या आजाराचे मोठे संकट ओढवले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गुरांचे बाजार पूर्णतः बंदी चे आदेश देण्यात आलेले असतानाही सावदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर गेट समोरच रोडवर गेल्या दोन -तीन रविवार पासून गुरांचा मोठा बाजार भरवत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे.
गेल्या तीन-चार महिन्याच्या पूर्वी पासून “लंपी स्किन” रोगाने अनेक जनावरे यांना लागण झाली आहेत तसेच बरेच जनावरे मरण सुद्धा पावले आहेत, त्या मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारे गुरांचा बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मध्यंतरी म्हशींचा बाजार सुरू करावा अशी मागणी होती,त्या बाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
असे असताना सुद्धा सावदा येथील सावदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर हायवेवर गुरांचा मोठा बाजार रविवारी भरवण्यात आला ,यात म्हशीचा भरणा मोठ्या प्रमाणावर होता, आठवड्याला येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असून बाहेर गावाहून गुरे येत असतात , विशेषत: बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची गुरे मोठ्या प्रमाणावर असतात, गुरांच्या बाजाराला परवानगी नसताना येथे बाजार भरतो कसा? याच्या कडून कोण पैसे वसूल करतो? या बाबत अधिक चौकशी केली असता प्रत्येक गुरांच्या गाडी मागे दोन-दोन हजार रुपये घेतले जातात,तसेच प्रत्येक व्यवहारातही दोन-दोन हजार रुपये घेतले जात असल्याचे सांगितले गेले,असे हजारो रुपये वसूल केले जातात,
दरम्यान, बाजार समिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गेटच्या बाहेरील बाजाराशी आमचा संबंध नसल्याचे सांगितले,तसेच आमचा कुठलाही कर्मचारी असे पैसे वसूल करीत नाही,असेही त्यांनी सांगितले.मग हे पैसे वसूल करतो कोण? लम्पि रोगामुळे गुरांचा बाजार बंदीचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश असताना हा बाजार भरतो कसा?म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यावर कारवाई होणार का? पैसे वसूल करतो कोण?याची चौकशी होणे गरजेचे आहे.