“मंडे टू मंडे न्युज इम्पॅक्ट”: अजंदा बायपास रस्ता खड्डे मुक्त
.खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील अजंदा येथे रेल्वे प्रशासनातर्फे विवरा रोड वरील रेल्वे फाटक कायम स्वरुपी बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून अजंदा ते विवरा या रस्त्याला जोडण्याकरिता नवीन बोगदा तयार करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते.
परंतु काही वर्षांनी सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्यामुळे समोरून वाहन आल्यास एकमेकांना साईड देण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत असत. या बाबत दि.१७-११-२०२२ रोजी “अजंदे रेल्वे बोगदा रस्ता हरवला खड्डयात” या मथळ्याखाली “मंडे टु मंडे न्युज” ने वृत प्रकाशित केले होते या वृत्ताची दखल घेत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण चे काम पूर्ण करण्यात आले.तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे सुद्धा जेसीबीच्या साह्याने उपटून रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आला आहे.या बाबत वाहनधारकांनी समाधान व्यक्त करून ” मंडे टु मंडे न्युज” चे आभार मानले आहे.