खिर्डी येथे साफसफाई अभावी गटारींची दयनीय अवस्था, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथील नवीन गावठाण भागात कित्तेक महिन्यांपासून गटारिंची सफाई करण्यात आली नसल्याने गटारीमध्ये सांडपाणी,मातीचे थर, प्लॅस्टिक पिशव्या काडी कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने पूर्णतः गटार ब्लॉक झाल्यामुळे या परिसरातील रहिवाश्यांच्या घराजवळ सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले असून दुर्गंधी येऊ लागली आहे.तसेच दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे.वर्षभर नाली सफाई करण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
नाली सफाईचे काम लाखो रुपये खर्च करून सुद्धा हल्ली अर्धवट नाली उपसा,बुजलेल्या नाल्या,मातीचे व कचऱ्याचे थर जमा होऊन खराब सांडपाणी जागीच अडून दुर्गंधी पसरू लागली आहे.सध्या स्थितीत गटारिंचीअवस्था बिकट स्वरूपाची झाली आहे.गटारीच्या उपसा अभावी खराब सांडपाणी एकाच ठिकाणी जमा होऊन डास,किडे व जंत तयार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे.मात्र याठिकाणी वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे.गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून स्वच्छतेवर नाही तर गलिच्छतेवर भर दिसतो. त्वरित गटारींचा उपसा करून साफसफाई करण्यात यावी अशी मागणी खिर्डी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
आरोग्य विभागाला जाग येणार का?
खिर्डी खु येथील नवीन गावठाण भागात असलेल्या गटारीची कित्येक महिन्यांपासून साफसफाई होत नसल्याने गटारीत प्लॅस्टिक पिशव्या,काडी कचरा माती अडकून बसल्याने गटार ब्लॉक झाली असून नागरिकांच्या घराजवळ सांडपाणी साचत असून त्या ठिकाणी डास जीव जंतू तयार होत असून नागरिकांना टायफॉइड मलेरिया चिकन गुनिया आदी विषाणू जन्य आजारांची लागण झाल्यास जबाबदार कोण राहणार तसेच या भागात आजारी व्यक्ती असून त्यांना याचा फार त्रास होतो.कोणाचे काही बरे वाईट होईल तेव्हा आरोग्य विभाग खडबडून जागी होईल का?असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.