वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे मोडले कंबरडे
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। दिवसेंदिवस कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्यामुळे नागरिकांना इंधनावर चालणाऱ्या गाड्यांऐवजी सायकलचा वापर करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिक वाहनांचा सुद्धा पर्याय केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिलाय. पण त्याच्या किंमती पाहूनच सामान्यांना आपला खिसा आणि आपल्या हातात येणारा तुटपुंजा पगार यामुळे सार्वजनिक वाहतूकीचाच प्रवासासाठी पर्याय वापरावासा वाटतोय.
घरगुती गॅस ने हजारी पार केली आहे. दुसऱ्या बाजूला जी महिन्याभराचे घराचे बजेट सांभाळते ती गृहिणी आता प्रत्येक खर्चापूर्वी विचार करत आहे. किंमतीमध्ये काही पैशांनी किंवा रुपयांनी जरी वाढ झाली तरीही ज्या गोष्टींसाठी मोजून पैसे आधीच बाजूला काढले होते त्यात तिला नुकसानच होत आहे. त्यामुळे साधं बाजारात जावून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू घ्यायच्या झाल्या तरीही तिच्या डोळ्यासमोर महागाई हाच शब्द उभा राहतोय. पण केंद्र सरकारला त्याचे काही पडलेले नाही. अशातच दूध, बिस्किट, साबणानंतर डाळीचे भाव वाढू लागले आहेत. यामुळे एकूणच प्रत्येकाच्या खिशावर परिणाम होत आहे. सामान्य माणूस महागाईच्या काळात भरडून निघत आहे आणि त्या मुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडल्याचे दिसून येत आहे.