रावेर बाजार समिती सभापतीपदी मविआ पॅनलचे सचिन पाटील तर उपसभापती पदी योगेश पाटील
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीच्या पॅनलने सचिन रमेश पाटील तर उपसभापतीपदी योगेश पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली.
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने मोठे यश संपादन केले. यानंतर सभापती आणि उपसभापती पदांसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. या पदांसाठी अनुक्रमे मंदार पाटील किंवा राजेंद्र चौधरी यांच्यापैकी नियुक्ती होईल असे मानले जात असताना आज झालेल्या निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करत महाविकास आघाडीच्या पॅनलने सभापतीपदासाठी सचिन रमेश पाटील व उपसभापती पदासाठी योगेश पाटील यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली व ती बिनविरोध ही करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी , सहा. निवडणूक अधिकारी आय.बी.तडवी, फकीरा तडवी यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभा पार पडली. याप्रसंगी सभापती पदासाठी सचिन रमेश पाटील व उपसभापती पदासाठी योगेश पाटील यांचे प्रत्येकी एक अर्ज सादर झाल्याने या दोन्ही पदांवर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या वेळी आ. शिरीष चौधरी यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.