सावदा शहरात दगडफेक, तणावपूर्ण शांतता
सावदा, ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। सावदा शहरात रात्री चांदणी चौक व बुधवारपेठ परिसरात अचानक दगडफेक झाल्याने खळबळ उडाली, या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने बाहेरून अतिरिक्त कुमुक मागवून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास सावदा शहरातील बुधवार पेठ परिसर,चांदणी चौक परिसरातील काही भागात अचानक जोरदार दगडफेक झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन धावपळ झाली.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दि २२ जानेवारी सोमवार रोजी अयोध्येत भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, त्या पाश्वभूमीवर देशभरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, त्या निमित्ताने शहरात सर्वत्र ठिकठिकाणी पताका वगैरे सुशोभीकरणाचे काम करत होते. काल रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक शहरातील बुधवार पेठ, चांदणी चौक सह गांधी चौक या भागात जोरदार दगडफेक केली गेली या मुळे अचानक झालेल्या या दागडफेकीच्या प्रकारामुळे काही वेळ मोठी धावपळ झाली, या वेळी दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच सपोनि जालींदर पळे यांचे सह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, सोबत डीवायएसपी राम शिंदे, फैजपूरचे सपोनि निलेश वाघ, निंभोरा सपोनि हरीदास बोचरे तहसीलदार कापसे यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
शहरातील वातावरण हे तणावपूर्ण असले तरी नियंत्रणात आहे. सर्व व्यवहार दैनंदिन रोजच्या व्यवहारांप्रमाणे सुरू असून सर्वत्र शांतता आहे.शहरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.