ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी ; रावेर तालुका स्वस्तधान्य दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। संपूर्ण राज्यात ई-पॉस मशीनवर धान्य वितरणामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडीअडचणी दूर करण्याबाबत व ३१ मार्च पर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय न झाल्यास दि. १ एप्रिल २०२२ पासून राज्यभरातील रास्तभाव दुकानदार आपल्या ई-पॉझ मशीन तहसिल कार्यालयात जमा करतील असा इशारा देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण देशातच आधार सर्वरला सतत येत असलेलया तांत्रिक समस्येमुळे तसेच आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एन.आय.सी. नवी दिल्ली आणि हैदराबाद येथील सर्वरवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे मागील दोन तीन महिन्यांपासून राज्यातील पॉस मशीन द्वारे होणारे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे.
ज्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये पॉस मशीन वर धान्य उपलब्ध नाही याउलट ज्या दुकानांच्या मशीनवर धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा पोहोच झालेलाच नाही यामुळे धान्य वितरण थांबलेले असून शिधापत्रिका धारकांमध्ये रेशन दुकानदारां विरोधात रोष आणि असंतोष वाढत चालला आहे. मुदत संपल्याने कालबाह्य झालेल्या ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात नियमितता राहिलेली नाही. पॉस मशीनला सततच्या येणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे विशेषतः सर्वर डाऊन व आधार प्रमाणीकरण न होणे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गंत मोफत धान्य वाहतूक आणि वितरणाचा अतिरिक्त ताण यामुळे देखील धान्याचे ऑनलाईन वितरण वेळेत आणि मुदत वाढीनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही.
तसेच ई पॉझ मशीन ह्या कालबाह्य झालेल्या असून त्या दु जी प्रकारातील असून सद्यःस्थितीत फोर जी सुरु असून लवकरच फाईव्ह – जी सुध्दा सुरु होईल. त्या अनुषंगाने कालबाह्य झालेल्या ईपॉझ मशीन बदलवून मिळणे, त्यावरील सीम कार्ड न चालणे, स्वस्त धान्य दुकानदार स्वतःच्या मोबाईलवरुन हॉटस्पॉट द्वारे ई – पॉझ मशीन चालवत असून त्याचाही भूर्दंड दुकानदारांना सहन करावा लागतो.
या सर्व तक्रारींमुळे राज्य शासनाने ई- पॉझ मशीन संदर्भात तात्काळ निर्णय घेण्याच्या दृष्टीने ०१ एप्रिल २०२२ पासून राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांकडून आंदोलनात्मक भूमिका घेऊन ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात येतील याची नोंद घ्यावी.निवेदन देण्यासाठी रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील, उपाध्यक्ष दिनेश महाजन, सचिव दिलीप साबळे, विठ्ठल पाटील, सदाशिव झाबरे, पी. टी. पाटील, सुधाकर पाटील, शरद चौधरी, अर्जुन कोळी, राजेश गजरे, गफूर तडवी, आदि सह दुकानदार उपस्थित होते