थोरगव्हाण भैरवनाथ यात्रोत्सवास मोठया जल्लोषात सुरुवात,प्रथा काय आहे? सामाजिक महत्व काय? वाचा सविस्तर …
सावदा, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील भैरवनाथ यात्रोत्सव दिनांक ०४ फेब्रुवारी २०२३ ते ०६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मोठया जल्लोषात साजरा होत असून सुरुवात झालेली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार भैरवनाथ हे या परिसरातील सर्व भाविकांचे ग्राम दैवत असून या भैरवनाथ मंदिराचा जवळपास ४५० वर्षाचा इतिहास आहे.
माघ शु. पोर्णिमा या दिवशी मोठया जल्लोषात तसेच मोठया भक्तीभावाने यात्रोत्सव साजरा केला जातो.
या यात्रोत्सवात महत्वाचा घटक म्हणजे आपापल्या पाल्यांचे लग्न जुळणे. हि लग्न जुळण्याची प्रथा सुद्धा पूर्वापार चालत आली असून या प्रथेने आता मोठे स्वरूप घेतले आहे. मोठया प्रमाणात वधू वर मेळाव्याचे आयोजन या यात्रोत्सवाच्या काळात केले जाते.
मोठया संस्थेने इतरत्र विखुरलेले समाज बांधव या यात्रेनिमित्त आवर्जून (वेळातवेळ काढून) गावी येवून आपापल्या पाल्यांसह योग्य वर, वधू शोधून लग्न पक्के करीत असतात. देवाचे दर्शन करीत असतात.
यात्रेच्या एक दिवस आधी या वधू वर मेळाव्याचे आयोजन केले जाते. नंतर त्याच दिवशी दुपारी ४ वाजेनंतर परिसरातील तसेच इतर आजूबाजूच्या गावांतून आलेल्या देव काठ्यांची विधिवत पूजा करून मोठया जल्लोषात मिरवणूक काढली जाते. नंतर रात्री ८ च्या सुमारात देव काठ्यांना गावाबाहेर गाव हळाजवळ स्थानापन्न केले जाते.
नंतर पुढील यात्रेच्या दिवशी भैरवनाथ बाबांचे मुकुट सकाळी ६ वाजेला चावडीवर पोहोचवून सकाळी १० वाजेपर्यंत विधिवत पूजा तसेच सजावट करून सकाळी १०.३० वाजेदरम्यान मुकुटाची चावडी ते भैरवनाथ मंदिर पर्यंत वाजेगाज्यासह मोठया जनसमुदाया समवेत मिरवणूक काढली जाते.
मिरवणूक मंदिराजवळ दुपारी १२ ते १२.३० पर्यंत पोहोचते. दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत मंदिरात मुकुट चढवून, डाग दागिने तसेच वस्त्र तथा योग्य श्रुंगार परिधान करून मंदिर दुपारी १.३० वाजे पासून समस्त भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. पुढील दिवशी दुपारी ३.३० वाजे दरम्यान तोडर उपडणे हा कार्यक्रम केला जातो हा सुद्धा या भैरवनाथ यात्रेचा महत्वपूर्ण असा भाग आहे.
तोडर म्हणजे साधारण ३ फुट लांबीचा जाड लोखंडी सूड त्याला साधारण २० फुट लांब साकळी (साकळदंड) लावलेली असते, मंदिराच्या समोरील आवारात जमिनीत पुरला जातो त्याला एका दमात जो कोणी नवयुवान ओढून काढेल (उपडील) त्याला उपस्थितांसमोर सम्मानित केले जाते. तोडर उपडणे हा कार्यक्रम झाल्यावर मुकुटावरील वरील दागीने आणि मुकुट काढून पुन्हा पुढील एक वर्षासाठी सुरक्षित ठिकाणी पोहचविले जाते.
यात्रोत्सवाचा कार्यकाळ :
दि. ०४ फेब्रुवारी २०२३ : देव काठी उत्सव संध्याकाळी ४ नंतर
दि. ०५ फेब्रुवारी २०२३ : भैरवनाथ मुकुट बाव्या मिरवणूक सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत.
दि. ०५ फेब्रुवारी २०२३ : मंदिरात भैरवनाथ देव दर्शन दुपारी १.३० ते दि. ०६ फेब्रुवारी २०२३ दुपारी १ पर्यंत
दि. ०६ फेब्रुवारी २०२३ : तोडर उपडणे दुपारी ३.३० ते संध्याकाळी ५ पर्यंत असा आहे.
या भैरवनाथ यात्रोत्सवात प्रामुख्याने १२ बलुचेदार जसे कोळी, न्हावी, भिल्ल, मांग, धोबी, कुंभार इत्यादी बंधू बांधवांचा सहभाग असतो. या भैरवनाथ यात्रोत्सवात भरीव देणगी भाविकांकडून मिळत असल्याने त्या देणगीतून मंदिराचा जिर्णोधार तसेच गावातील इतर मंदिरांचा जसे मरिमाता मंदिर जिर्णोधार केला जातो. अश्या प्रकारे मोठया जल्लोषात हा ३ दिवसीय भैरवनाथ यात्रोत्सव सुरक्षिततेचे पालन करून साजरा केला जातो.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा