खिर्डी येथे शौचालय सेप्टिक टाकी ओव्हरफ्लो, प्रशासनाचे दुर्लक्ष
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डी खु येथील नवीन गावठाण भागातील बलवाडी रस्त्यावर गेल्या २० ते २५ वर्षापासून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे.सदर भागात ग्रामस्थांची घरे बांधली गेली आहेत. येथील जीर्ण अवस्थेत असलेले सार्वजनिक शौचालय बंद करण्यात आले.मात्र सेप्टिक टाकीवर ठेवण्यात आलेल्या फरशा गायब झाल्यामुळे सदरील सेप्टिक टाकीचे तोंड उघडे पडले आहे.
या उघडे पडलेल्या टाकीत अनेक वेळा कुत्री,बकरी,वासरे पडली आहेत परंतु आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे त्याचा जीव वाचविण्यात आला आहे.तसेच सदरील टाकीतील मैलयुक्त घाण पाण्याचा उपसा करण्यात यावा याबाबत अनेकवेळा स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली तरीही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजपावेतो करण्यात आली नाही हे दुर्दैव. तसेच गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाच्या पाण्यामुळे सेप्टिक टाकी ओव्हरफ्लो झाली असून मैलायुक्त घाण पाणी बाहेर येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आता तरी निद्रावस्थेत असलेल्या स्थानिक प्रशासनास जाग येणार का? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.स्थानिक प्रशासनाने लक्ष देवून त्वरित उपाय योजना करावी अशी मागणी ग्रामस्थांसह सुज्ञ नागरिक करीत आहे.