माहेरून ५० हजार रुपये न आणल्याने घटस्पोट देणाऱ्या पतीस दोन वर्ष कारावासाची शिक्षा
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हुंडा म्हणून व्यापार करण्यासाठी पत्नीने माहेरून ५० हजार रुपये आणावे या साठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून पैसे न आणल्याने तलाक देणारा चिनावल येथील पती शेख हसन शेख सत्तार याला दोन वर्ष कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा रावेर न्यायालयाने दिली. ही शिक्षा २५ जानेवारी गुरुवार रोजी सुनावली.
गुरांचा व्यापार करण्यासाठी पत्नीने माहेराहून ५० हजार रुपये हुंडा म्हणून आणावा यासाठी शेख हसन शेख सत्तार हा पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाण करीत होता शिवाय जीवे मारण्याची धमकी देत त्याने तीन वेळा तलाक म्हणून बेकायदेशीर घटस्फोट दिला. या प्रकाराबाबत शेख हसनची पत्नी तबस्सुम नाज हिने सावदा पोलिसांत शेख हसन शेख सत्तार, वय ३० वर्ष, रा.चिनावल, ता.रावेर. यांचे विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून मुस्लीम महिला संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्या.अनंत बाजड यांचे कोर्टात हा खटला सुरू होता, या खटल्यात सात जणांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदार, पंच तपासाधिकार्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्या.अनंत बाजड यांनी शेख हसन शेख सत्तार, वय ३० वर्ष , यास दोन वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा तथा दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.एन.डी.तायडे व अॅड.श्रीकृष्ण दुट्टे यांनी काम पाहिले. पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल संजय बावस्कर यांनी काम पाहिले.या गुन्ह्याचा तपास सावद्याचे तत्कालीन सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुरेश अढायके यांनी केला