ब्रेकिंग : रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळ्यात लेखाधिकार्यांसह चौघांना अटक !
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील पंचायत समितीत झालेल्या सुमारे दीड कोटीच्या वर रूपयांच्या बहुचर्चीत शौचालय घोटाळ्यात अटक सत्रास सुरवात झाली असून रात्री उशीरा लेखाधिकार्यांसह चार जणांना पोलिसांनी अटक केली असून काही छोटे बडे मासे या प्रकरणात गोत्यात येण्याची शक्यता आहे. सदरील कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.
रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दीड कोटीच्या वर भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी रावेर पोलिसात अडीच महीन्यापूर्वी दोन जणांन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अद्याप ते पसार असून पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरु असतांना अखेर या भ्रष्ट्राचार प्रकरणात संशयित आरोपींच्या अटकसत्रला सुरुवात झाली आहे. रावेर पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, बाबुराव संपत पाटील (रा विवरे बु), रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी (रा पाडळा बु) यांना अटक केली आहे. चार जणांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली असून अनेक वेळा अनुदान लाटून घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे पंचायत समितीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अनुदान लाटून अपहाराला हातभार लावणार्या मोठया मासे वरही कारवाईची शक्यता असून अटक होण्याची शक्यता आहे. प्रकरणात एक पेक्षा अधिक वेळा अनुदान प्राप्त करून घेतलेले तब्बल १२६ जण पोलिसांच्या रडारवर असुन तसेच पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे. सदरील कारवाई पोलिस निरिक्षक कैलास नागरे, सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांच्या पथकाने केली आहे.