रावेर वैद्यकीय अधिक्षकांच्या नांवाने लेटर बॉम्ब : बनावट सही, शिक्याचा वापर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा । येथील वैद्यकीय अधिक्षकांच्या नांवाने लेटर बॉम्बचे प्रकरण समोर येत असून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. एन. डी. महाजन यांची बनावट सही, शिक्का व बनावट पत्र तयार करून मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयास मेळघाट गडचिरोली येथेबदली करून मिळावी अशी मागणी केल्याचे प्रकरण गुरुवारी उघड झाले आहे. या प्रकरणी डॉ. एन. डी. महाजन यांनी रावेर पोलिसांत तक्रार दाखल करत, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देखील याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत अधिक असे, येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.एन.डी.महाजन त्यांच्या कामाच्या पद्धती आणि ग्रामीण रुग्णालयात कुणाचा हस्तक्षेप खपवून घेण्यास त्यांचा मज्जाव असल्याने, त्यांना यंत्रणेतून विरोध झाल्याचे काही प्रकार अलीकडे घडले असतांना, आता आणखी बनावट सही शिक्याचा वापर करत लेटर बॉम्ब उघडकीस आले आहे. त्यांच्या कार्यालयातील लेटरपॅडसारखी खोटी लेटरपॅड तयार करून, मेडिकल ऑफिसर रुरल हॉस्पिटल रावेर या नावाचा खोटा शिक्का करून प्रिन्सिपल सेक्रेटरी मुंबई यांच्याकडे खोट्या सहीने मेळघाट किंवा गडचिरोली मध्ये बदली करून मिळावी अशी मागणी केलेले बनावट पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली असता, पत्राची नक्कल आणि त्यावरील जावक नंबर घेऊन पोलिसात तक्रार केली आहे. या पात्रावरील जावक क्रमांक देखील खोटा आहे. तर पत्र देखील त्यांच्याकडे टाईप केलेले नसल्याचे डॉ.महाजन यांचे म्हणणे आहे. सदरील पत्र ११ जून रोजी पाठवण्यात आले असून त्यामुळे त्यांना मनस्ताप होत आहे.याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे .