रावेर तालुका भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर ! नाराजीचे पक्षापुढे आव्हान ?
Monday To Monday NewsNetwork |
रावेर, मंडे टू मंडे न्युज चमू | भारतीय जनता पक्षाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पक्षांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या असून नऊ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. या निमित्ताने मात्र, तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना कोणी विचारत नसून आयाराम गयारामांना तसेच ठराविकांनाच डोक्यावर घेत महत्त्व दिले जात असल्याची भावना जुने कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. विकास कामांच्या वाटपावरूनही कार्यकर्त्यांमध्ये खदखद समोर येत असून फक्त ‘चमको’ गिरी करणाऱ्यांचाच पक्षात उदो उदो होत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या बैठकीचे कार्यकर्त्याना निरोप दिले जात नसल्याची ओरड होत असून पक्षाच्या बैठकीत याविषयावर चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तालुका निवडीला अधिक महत्त्व आले आहे. भाजपला पूर्वाश्रमीचे भाजप नेते तथा सद्या राष्ट्रवादीत असलेले माजी मंत्री आ. एकनाथराव खडसें यांचे तगडे आव्हानं असणार आहे. गेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खडसेंच्या पॅनेलची सरशी झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. रोहिणी खडसेंना राज्य महिला प्रदेशाध्यक्ष पद देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ताकद दिली गेली आहे. तर भाजपच्या गोटात निवडणुकीत पक्षातच गद्दारी झाल्याचा भुतकाळ पाठलाग करत आहे. त्यामुळे पक्षाकडून विरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई न झाल्याचा सल पराभूत उमेदवार व पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचेही बोलले जात आहे.
गेल्या ग्रामपंचायत व रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीने भाजपच्या पॅनलचा दारूण पराभव केला होता. भाजपच्या स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधी कारवाया केल्याने भाजपचे उमेदवार पराभुत झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आले होते. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. परंतु, पक्षाकडून कारवाई झाल्याचे दिसत नाही त्यामुळें अधून मधून त्या विषयाने पक्षांतर्गत राजकारण तापताना दिसते. तालुक्यात महत्वाच्या अश्या रावेर व सावदा दोन नगरपालिकाच्या निवडणुकाही आगामी काळात येऊ घातल्या असुन शहरांतील कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे काम करावे लागणार आहे.
आ. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशानंतर रावेर भाजपला ग्रामपंचाय व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पाहिजे तसा करिष्मा दाखवा आलेला नाही. भाजप प्रथमच तालुक्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणूक एकनाथ खडसे यांच्याशिवाय लढणार आहे. याठिकाणी राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे भाजपला मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे निवडणूक रणनीती व संघटनात्मक अनुभव असलेला पदाधिकारी भाजपकडून देण्याची शक्यता आहे. परंतू भाजपच्या गोटात ठराविक कार्यकर्त्यांनाच विचारांत घेतले जात असल्याने नाराजीचा सुर असल्याची चर्चा आहे. विकास कामांच्या वाटपावरूनही कार्यकर्त्यांमध्ये खदखद समोर येत असून ठराविक जणांचाज वरचष्मा असल्याची चर्चा आहे. या सर्व नाराजीचा फटका आगामी निवडणुकांमध्ये जानवण्याची शक्यता अधिक आहे. एकंदरीत तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करता जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व नविन तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यापुढे नाराज कार्यकर्त्यांना समजूत घालून नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असणार असून आता या ठिणगीचे लाव्यात रूपांतर होते की वेळीच ती विझवली जाते हे येणार काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे !
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून शिवसेने प्रमाणेच जिल्ह्यात लोकसभानिहाय जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले आहे. त्यानुसार प्रथमच रावेर ग्रामीण, जळगाव ग्रामीण व जळगाव महानगर, असे तीन अध्यक्ष भाजपकडून जाहीर करण्यात आले आहेत. रावेर लोकसभेसाठी अमोल जावळे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करत जातीय समीकरण साधल्याचे पाहायला मिळाले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा