“गोड साखरे” विना “दिवाळी” झाली “कडू”, आनंदाचा शिधा किट मधून साखर गायब
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा । दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त . १००/- रुपयांमध्ये प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच वितरीत करण्याचे निर्देश दिले .राज्य शासनाचा या योजनेचा निर्णय स्तुत्य असून या निर्णयाचे लाभार्थ्यांकडून स्वागत केले जात आहे.
त्या नुसार स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्याना आनंदाचा शिधा किट वाटपास सुरुवात करण्यात आली असून प्रति शिधापत्रिकास १००/- रुपयांमध्ये चार वस्तू ऐवजी १ किलो रवा, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या फक्त तीनच वस्तूंचा संच वाटप केला जात आहे, शासनाकडून साखर पुरविली गेली नसल्याने लाभार्थ्यांना साखर दिली जात नसल्याने लाभार्थ्यांची ‘दिवाळी’ “गोड साखरे विना कडू” झाली आहे.साखरे सह चणाडाळ सुद्धा काही ठिकाणी दिली गेली नाही,या बाबत सर्वत्र चर्चा सुरू असून रावेर तालुक्यातील सावदा, मोठा वाघोदा, परिसरासह यावल तालुक्यातील आमोदा, विरोदा परिसरा सह जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी साखर मिळत नसल्याची माहिती मिळत असून साखर नंतर दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.