भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी अखेर माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. घोषणा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांच्या् नावाची केली. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता चव्हाण प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची महायुती सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्षपदी नवी नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तर रविंद्र चव्हाण यांच्या आधी नव्या कार्यकारी अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र महाजन यांची वर्णी मंत्री पदावर लागल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदी चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते.
चव्हाण हे डोंबिवलीचे (जि. ठाणे) आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. ते पक्षाचा मराठा चेहरा आहेत. अलिकडेच त्यांची पक्षाच्या संघटन पर्वाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.बमहायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद देण्यात आले नव्हते.अखेर शनिवारी महाराष्ट्र भाजपचा शिर्डी येथे महाविजयी मेळावा सुरु असतानाच रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.