साखळी बॉम्बस्फोट, भाजप-मनसे युती, तपास यंत्रकांची छापेमारी, लोडशेडिंग अशा मुद्यावर शरद पवारांचे भाष्य वाचा सविस्तर !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : देशात सध्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यात केंद्राच्या एजन्सीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना काहीही करून हि राज्ये हातात हवी होती, परंतु त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि जनतेने त्यांना साथ दिली नाही त्यामुळे त्यांचा अपेक्षा भंग झाला. ते लोक याठिकाणी हस्तक्षेप कसा करता येईल, कसे ताब्यात घेता येईल याचा विचार करून कामाला लागले आहेत. त्यामुळेच हि छापेमारी सुरु असल्याचे खा.शरद पवार यांनी सांगितले.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे आयोजित महिला संकल्प परिषदेच्या निमित्ताने खा.शरद पवार जळगावात आले असून गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा.पवार म्हणाले कि, राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वाकडे दिसते आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपली दिशा, ध्येय ठरवत असतो. आजपर्यंत मनसे आपली जागा निर्माण करू शकले नाही परंतु राज्यातील सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ नये अशी भीती मला वाटते, असे पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी जातीवाद माझ्यावर कसा टाकला हे मलाच कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाने सर्व समाजाला सोबत घेऊन न्याय दिला. फडणवीसांकडे दुसरा काही मुद्दा नाही म्हणून ते असे वक्तव्य करत असतात.
खा.पवार म्हणाले, आज संपूर्ण भारतात वीज टंचाई आहे. दुर्दैवाने हा राष्ट्रीय प्रश्न झाला आहे. कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने वीज तुटवडा आहे. महाराष्ट्रातील सर्व नेते या प्रश्नावर गांभीर्याने विचार करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली असून दोन-तीन दिवसात ते प्रभावी पर्याय कळवतील, असे त्यांनी सांगितले. काही दिवसापूर्वी आणखी ४ मंत्री जेलमध्ये जाणार असे वक्तव्य माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केले होते, त्यावर बोलताना खा.पवार म्हणाले, केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. गिरीश महाजन गृहमंत्री नाही, त्यांच्या हातात काही सत्ता नाही. अलीकडे एक नवीन पद्धत सुरु झाली आहे. जे प्रत्यक्ष सत्तेत नाही, त्यांनी काहीतरी भूमिका घ्यायची आणि त्यानुसार निर्णय घ्यायचा असे काही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
खा.पवार पुढे म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचे कौतुक केले होते. जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केलेला होता. पुरंदरेंनी शिवजयंतीच्या तारखेवरून माफी मागितली होती. त्याच्यावर अधिक बोलून वाद वाढवू नये, असे पवार म्हणाले. भविष्य मनसे, भाजप युती होईल का हे सांगता येणार नाही. पुढील ५ वर्ष देखील महाविकास आघाडीच राहावी असा आमचा मानस आहे. नागरिकांनी चांगले सरकार आणि सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे खा.पवार यांनी सांगितले.
कोळसा उत्पादन आणि वितरण हे केवळ मोजक्याच ठिकाणी केले जाते, भाजप शासन असलेल्या राज्यांना कोळसा पुरवठा नियमित होत असल्याने तेथे वीजप्रश्न कमी आहे, परंतु महाराष्ट्रा पुरते सांगायचे तर राज्यात ऐन उन्हाळ्यातच नव्हेतर गेल्या काही महिन्यापासून वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा केला जात नाही, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मागणीच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने वीजटंचाई निर्माण झाली आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांना तोडगा काढण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. सोमवार मंगळवार नंतर याबाबत योग्य तो निर्णय होईल.
१४ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर ट्वीट केले होते, यात ट्वीटमध्ये १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे शरद पवार यांनी खोटे सांगितले असून अतिरिक्त बॉम्बस्फोटाची चुकीची माहिती दिली. यावर उत्तर देतांना पवार म्हणाले, मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना ते १३ ठिकाणी झाले असून त्यात मुस्लीम भागाचं नाव सांगितले होते. हेहि तितकेच खरे आहे. याचे कारण, १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले तो परिसर सर्व हिंदुंचा होता. त्यासाठी जे साहित्य वापरले गेले ते साहित्य हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीत तयार होत असल्याची माहिती होती. यात बाहेरील देशांचा हात असून हिंदू-मुस्लिमांतील तेढ वाढविण्यासाठी कुणीतरी शेजारचा देशाचे काम होते. स्थानिक मुस्लीम नसून मोहम्मद अली रोड परिसरात स्फोट झाला असे सांगितल्यामुळे जातीय दंगली होणार होत्या, त्या झाल्या नाहीत.
या परकीय शक्तीच्या विरुद्ध उभे राहावे, या मताशी मुंबईतील हिंदू-मुस्लीम समुदाय एकत्र आले. त्यात नेमण्यात आलेल्या श्रीकृष्ण आयोगाकडून समन्स देखील आले. या चौकशीत विचारले गेले, कि १३ वा बॉम्बस्फोट या परिसरात झाला, त्यावेळी मी अशी भूमिका घेतली नसती तर अजून आग लागली असती, समाज हिताच्या दृष्टीकोनातूनच हा निर्णय होता आणि ज्यांना याचे गांभीर्य कळत नाही, त्यांनी अशी विधाने केली तरी त्याची फारशी नोंद घेण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले.