बनावट नोटा तयार करण्याच्या कारखान्यावर धाड
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने आचारसंहिता लागलेली असून सर्व राजकीय नेते आपापल्या पक्षाच्या प्रचारात मग्न आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचे वाटप करण्यात येत आहेत. सभा आणि रॅलींसाठी सुद्धा पैसे देऊन लोकांना जमविण्यात येत आहे.काही ठिकाणी पैशाचे आमिष दाखवले जात असून त्यासाठी बनावट नोटांचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांकडून आचासंहिता लागल्या पासून पैसे जप्त करण्याच्या सर्वाधिक कारवाया करण्यात आलेल्या आहेत.त्यातच पुन्हा मुंबई पोलिसांनी दि. ४ मे शनिवार रोजी रात्री बीकेसी च्या भारतनगर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत मुंबई पोलिसांनी ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी कधीपासून हा कारखाना सुरू केला, या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत का, तसेच या रॅकेट मध्ये आणखी कोणी आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत. दोघा आरोपींना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत.