धक्कादायक: दूषित रेमडेसिवीरचा पुरवठा, ९० रुग्णांना दूषित रेमडेसिवीरची बाधा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रायगड वृत्तसंस्था: देशासह राज्यात कोरोनाने हौदोस मांजला असून त्यावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचीर बाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे रायगडमध्ये ९० रुग्णांना दूषित रेमडेसिवीरची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत.
आधीच रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा जाणवत असतांना आता दूषित रेमडेसिवीरचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही रुग्णांना हेटेरो हेल्थकेअर कंपनीची कोविफोर नामक लस दिल्यानंतर त्रास झाल्याची बाब समोर आली. या इंजेक्शनच्या ५०० लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १२० लसी रुग्णांना देण्यात आल्या. यातील ९० जणांना लस घेतल्यावर त्रास जाणवला. रुग्णांवरील प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हेटेरो हेल्थ केअर कंपनीने कोविफोर नावाच्या बॅच नंबर एचसीएल 21013 इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याची विनंती केली. याबाबत कंपनीच्या वतीने एक पत्र गुरुवारी जारी करण्यात आले. तांत्रिक कारणामुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा, असे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना पेण येथील सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन गि. दि. हुकरे यांनी या बॅचमधील सर्व कोविफोर इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना आणि वितरकांना दिले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत राज्य सरकारला माहिती देण्यात आल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.