वादळी वारा, गारपिटीत रावेर तालुक्यातील ६४९ शेतकऱ्यांच्या ४५१ हेक्टर मधील पिक नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शनिवारी दि. १२ रोजी दुपारी चारच्या सुमारास रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळीच्या आपत्तीत रावेर तालुक्यातील तब्बल ४५१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्या मुळे ६४९ शेतकरी बाधित झाले आहेत. याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

अचानक अवकाळी वादळी वारा व गारपिटीत रावेर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात सर्वाधिक नुकसान रावेर गावात झाले असून तेथे २८० हेक्टर क्षेत्रातील ३९५ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच तालुक्यातील उटखेडा, नेहेते, आजंदे , भातखेडा, दोघे, खिरवड, विवरे बुद्रुक,विवरे खुर्द, वडगाव, गौरखेडा,चुनखेडा आदी गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून या घटनेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून प्रशासनाकडून मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील मदतीसाठी अंतिम अहवालावर निर्णय घेतला जाणार असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे.