सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची आर्थिक फसवणूक
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत तुमच्या मुलाला पकडले आहे असे सांगून १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना यावल शहरात घडली.
यावल शहरातील विस्तारित भगात पत्नी सह रहात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा एरोली, मुंबई येथे एका कंपनीत नोकरीस आहे.
बुधवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या व्हाट्सअप वर एका अज्ञात इसमाचा कॉल आला, संबंधीत इसमाने आपण ” सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत तुमच्या मुलाला गैरकृत्य केल्या प्रकरणी आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. तुम्ही तात्काळ दीड लाख रुपये द्या.” अशी पैशांची मागणी केली. तसेच त्यांच्या मुलाची भयभीत अवस्थेतील बनावट ऑडिओ क्लिप त्यांना ऐकवली. तेव्हा संबंधित वृध्द इसम आपल्याच मुलाची समजून घाबरून गेले व त्यांनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून एक लाख ३० हजार रुपये संबंधित इसमाने दिलेल्या फोन पे खात्यावर पाठवले. परंतु त्यांनी तात्काळ आपल्या मुलाला फोन केला असता आपण मुंबई येथे आहोत व मला कोणीच पकडले नव्हते किंवा, अशी कुठली घटना घडली नव्हती असे मुलाने सांगताच वृद्ध दांपत्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा लागलीच त्यांनी यावल पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने अज्ञात मोबाईल वापरकर्ते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..