कोरोना रुग्णांना उपचार नाकारला, खासगी रुग्णालयाच्या ८ नर्सिंग स्टाफवर गुन्हा दाखल !
सांगली (वृत्तसंस्था)। मिरज येथील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नर्सिंग स्टाफच्या विरोधात महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आठ जणांवर मेस्मांतर्गत गुन्हा दाखल केला. कोविड-१९ उपचारासाठी आरक्षित केलेल्या कोणत्याही हॉस्पिटलने उपचारास टाळाटाळ केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही आयुक्त कापडणीस यांनी दिला.
जिल्ह्यात आरक्षित केलेल्या सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर वेळेत उपचार केले जावेत, असा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या आहेत. मिरजेतील सेवा सदन हे खाजगी हॉस्पिटल असून, जिल्हा प्रशासनाने ते कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित केले आहे. मात्र, मिरजेतील सेवासदन हॉस्पिटलने कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये गेले होते, त्यांच्यावरील उपचार आणि देखभालीसाठी नर्सिंग स्टाफने असमर्थता दर्शवली. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रारी केल्या. तक्रारी येताच आयुक्त कापडणीस यांनी तातडीने सेवा सदन हॉस्पिटलची चौकशी केली. चौकशीदरम्यान हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफने उपचारासाठी टाळाटाळ केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत महापालिका प्रशासनाने पूजा कलाब, योगेश आवळे, केतन कांबळे, केतन सूर्यवंशी, ज्योती कांबळे, श्वेता भाट, ऋषिकेश पाटील आणि पूजा भोसले या आठ जणांवर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांवर मेस्मांतर्गत कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.