संतोष देशमुख हत्या ; अखेर वाल्मिक कराडवरही “मकोका”
बीड, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर आता वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा पुरावा असल्याचा दावा एसआयटीने केला असल्याची माहिती आहे. या आधी खंडणीच्या गुन्ह्यातही एसआयटीकडेच त्याचा ताबा होता. दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाल्यान कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये रस्त्यांवर टायर पेटवल्या आणि परळी बंदची हाक दिली. ऐन संक्रांतीच्या दिवशीच परळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.