सरपंच पती, सासरा, उपसरपंच, ग्रामसेवक सर्वांना ३० हजारांच्या लाच प्रकरणी अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गावचा कारभारी म्हणजे सरपंच, मात्र सरपंचपदी महिला असली की तिचा पतीच कामात ढवळाढवळ करून कारभार करतो ही बाब काही नवीन नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे.गावातील एक कर प्रकरण मिटवतो असं म्हणत ३० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आमगव्हान गावातील संरपंचांचा पती, सासरा, उपसरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंचांच्या सासऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आंमगव्हान गावातील एका जुन्या प्रकरणाची कर वसूली करून ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतचे प्रकरण चौकशी मागे घेणे आणि नमुना नंबर १० पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देण्यासाठी तक्रारदाराला ५० हजाराची लाच मागितली. यापैकी ३० हजारांची रक्कम स्वीकारताना वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी सरपंचांच्या सासऱ्यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी ग्रामसेवक राजेश विठ्ठलराव ठाकरे ,सरपंचांचे सासरे देविदास ऊर्फ दयाराम चरणदास मेहळा (मेहल्डे), सरपंच पती सतिश देविदास मेहळा आणि उपसरपंच देवेंद्र भिमराव कानोडे अशा चौघांवर मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या विरूद्ध ग्रामपंचायतीने नमुना नंबर १० पावती पुस्तकात कर वसुली करून ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतची तक्रार मागे घेणे आणि नमुना नंबर १० पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देणेकामी मदत करण्याकरीता ग्रामसेवक राजेश ठाकरे, सरपंच सासरे देविदास मेहळा यांनी सरपंच, उपसरपंच यांचे करिता ३० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.
दरम्यान, लाच मागण्यास उपसरपंच देवेंद्र कानोडे यांनी प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. रविवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत आरोपी सतीश मेहळा यांनी सदर प्रकरण मिटवण्यासाठी १० हजार रुपये स्वतः करता वेगळे मागणी केली. तसेच सरपंचांचे सासरे यांनी ५० हजाराची मागणी करून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाचेची रक्कम आमगव्हाण येथे राहते घरी स्वीकारले. उर्वरित २० हजार रुपये लगेच देण्याचे सांगितले.
याप्रकरणी १) राजेश विठ्ठलराव ठाकरे, वय ५७ वर्षे, पद ग्राम सेवक, ग्रामपंचायत आमगव्हाण,रा.मंगरुळपीर जि.वाशिम. २) देविदास ऊर्फ दयाराम चरणदास मेहळा (मेहल्डे) वय ६३ वर्षे, व्यवसाय मजुरी, (खाजगी ईसम तथा सरपंच सासरे) रा.आमगव्हाण ता.मानोरा जि.वाशिम. ३) सतिश देविदास मेहळा वय ३१ वर्ष,व्यवसाय मजुरी
(खाजगी ईसम तथा सरपंच पती)रा.आमगव्हाण ता.मानोरा जि.वाशिम. ४) देवेंद्र भिमराव कानोडे वय ३९ वर्षे, व्यवसाय शेती, उपसरपंच-ग्रामपंचायत आमगव्हाण. रा.आमगव्हाण ता.मानोरा जि.वाशिम. या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पो.स्टे. मानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मानोरा पोलीस अधिक तपास करत आहे.