सावदा येथील गट नं.१३५ च्या नाल्याच्या शेतजमीनीत प्लॉटीची बेकायदा विक्रीची बुकींग !ग्राहकांची दिशाभूल?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा नगरपालिका हद्दीतील फैजपूर रोडवरील सुगंगानागर लगतच्या गट नं.१३५ च्या शेत जमीनीवर न.पा.सह नगर रचना विभाग जळगांव, जिल्हाधिकारी जळगांव येथून नियमानुसार कोणतीच परवानगी न घेता शेत मालकांनी येथील नैसर्गिक पाण्याच्या नाल्याचे व्यवसायाच्या उद्देशाने सपाटीकरण करून परस्पर मनाप्रमाणे बेकायदेशीर ले – आऊट बनवून,प्लाट बुकींग सुरू केली असून अनेकांकडून ऍडव्हान्स रक्कमा घेऊन प्लाट बुक केले आहेत सदरच्या प्लाट पाडलेल्या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असल्याचे प्लाट बुक केलेल्या व्यक्तीस माहिती झालेवर ऍडव्हान्स दिलेली रक्कम सदर व्यक्ती परत मागत आहेत. लोकांची दिशाभूल करून येथे प्लाटीची विक्री केली जात असल्याची माहिती मिळत आहे. तसेच यात शासनाचीही दिशाभूल होत असल्याचे दिसते. शेत जमीनवर खुणा देखील टाकून शेत जमीनीची प्लाटीत विभागणी करून लोकांना विक्री करत असल्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात सावदा नगरपालिकेकडे याबाबत पुराव्यानिशी तक्रारी दिलेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदरील गटनं.१३५ हा पालिका हद्दीत असून या गटामध्ये पुर्वापार वर्षापासून कोचुर गावाकडून नैसर्गिक पाण्याचा नाला वाहत असतो.प्रत्येक पावसाळ्यात येथे पाण्याचा पूर वाहत असतो, या बाबत संपूर्ण परिसराला महिती आहे. येथील संपूर्ण नाल्याचे सपाटीकरणं केल्याने येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असते, गेल्या पावसाळ्याच्या दिवसात बेकायदेशीरपणे सदर शेतजमिनीवर परस्पर प्लॉटी दर्शवण्यात कामी या नैसर्गिक नाल्याचे सपाटीकरण करण्यात आल्याने सदर परिसरातील रहिवासी लोकांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी शिरून गेल्याने याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागला.स्थानिकांनी सुद्धा या बाबत तक्रारी केल्या होत्या, या वेळी परिसराची लोकप्रतिनिधींनी पाहणी सुदधा केली होती,त्यावेळी नगरपालिका प्रशासनाकडून जेसीबी द्वारे तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची विल्हेवाट लावण्या करीता तारेवरची कसरत करून चारी खोदावी लागली होती.व सदर जेसीबी चा खर्च नगरपालिकेला करावा लागला.सदर शेत मालकाकडून हा खर्च पालिका वसूल करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तरीही सदर नैसर्गिक नाल्याचे बेकायदेशीरपणे सपाटीकरण करणाऱ्यांवर कोणतीच कठोर कारवाई प्रशासनाकडून न होणे बरेच काही सांगून जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत माहिती सह नागरीकांची तक्रार देखील पालिका प्रशासनाला प्राप्त असूनही सदर जमिनीला बिनशेती परवानगी करिता तात्पुरता स्वरूपाची परवानगी पालिका प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.? तर प्लॉटी विक्री करणारा, ग्राहकांना पालिकाप्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी मिळाली असल्याचे सांगत प्लाटिची बुकिंग सुरू ठेऊन ग्राहकांची फसवणूक करीत आहे. या प्रकरणी पुराव्यानिशी नगर रचना विभाग जळगांव व जिल्हाधिकारी जळगांव येथे काही जागरूक नागरिक सदर प्रकरणी लवकरच तक्रार दाखल करणार आहे.