रावेर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या प्रकरणी गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, ता. रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून त्याचा वापर केल्या प्रकरणी रावेर कृषिउत्पन्न बाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी फिर्याद दिल्याने सावदा पोलीस स्टेशनला रात्री दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला .
या बाबत अधिक माहिती अशी की,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केळीची वाहतूक केली जात असताना यासाठी बाजार समिती प्रत्येक ट्रककडून ३०० रूपये शुल्क आकारणी करत असते. दरम्यान, १२ ऑगस्टला बाजार समितीच्या कर्मचार्याने महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील चोरवड नाक्यावर एका ट्रक चालकाकडील पावतीची तपासणी असता त्यावर बाजार समितीचा शिक्का नसल्याने शंका आल्याने त्याने ट्रक चालकास पावती कुठून फाडली? अशी विचारणा केली.सादर ट्रक चालकाने सावद्यातील एका व्यक्तीचे नाव सांगितल्याने बनावट पावती होत असल्याचे बिंग फुटल्याने खळबळ उडाली.
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून त्याचा वापर करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने रावेर कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे यांनी तातडीची बैठक घेऊन संचालकांच्या झालेल्या बैठकीत या बाबत पोलीस स्थानकात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णया नुसार रावेर बाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार जुनेदखान जफरखान.रा.सावदा, व आसिफ खलिल भाट .रा.आंदलवाडी, ता.रावेर. या दोघांच्या विरुद्ध काल रात्री सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.