गाते येथे घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Monday To Monday NewsNetwork।
सावदा (प्रतिनिधी)। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पाण्याच्या टाकी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर सिमेंट काँक्रीटचे रस्ते व गटारी नसल्याने या भागातील रहिवाशांना चिखलातून व शेवाळ युक्त घाण पाण्यातून लहान मुले,अबाल वृद्ध नागरिकांना रस्ता पार करावा लागतो.या ठिकाणी अनेक वेळा पाय घसरून पडल्याने अनेकांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असल्याचे सुध्दा सांगितले गेले.एखाद्याचा जीव गेल्यावरच जाग येईल का?असा संतप्त सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.
स्वच्छ भारत..स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन व प्रशासनाकडून वेळोवेळीआवाहन करण्यात येते.गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येते. काही ठिकाणी अस्वच्छता असल्याने येथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. ठिकठीकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतीना स्वच्छतेसाठी निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे अस्वच्छतेवरुन स्पष्ट होते.तसेच गावातील अनेक भागातील नाल्या घाणीने तुडूब भरलेल्या असून ते घाणपाणी रस्त्यावर वाहताना बघावयास मिळते.काही वार्डात कचरा अस्ताव्यस्त पसरुन रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे. गाव स्वच्छतेवर भर दिला असल्याची ओरड प्रशासनाकडून केली जात असली तरी गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.हे यावरून दिसून येत आहे.लवकरात लवकर घाणपाण्याचे डबके बुजविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी बोलून दाखवली.