राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी : भाजप नगराध्यक्षांसह ९ नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा| भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि नऊ नगरसेवकांना म्हणजेच २ नगरसेविका वगळता बाकी सर्वांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर हजेरी लावल्याने तालुका भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलावर लटकत आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावदा शहर आढावा बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांच्यासह ९ नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मागील २०१६ साली झालेल्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत अनिता पंकज येवले व १० जण नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यातील २ नगरसेविका वगळता बाकी सर्व राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने खडसे यांचे समर्थक मानले जाणारे नगराध्यक्षासह नगरसेवक यांनी अपात्रतेच्या कारणास्तव पक्षांतर केले नव्हते मात्र, राष्ट्रवादीच्या बैठकेला हजेरी लावत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट केले होते.
यामुळे या प्रकाराची भारतीय जनता पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, यासंदर्भात “मंडे टू मंडे” ने भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत या नोटीसला उत्तर देण्याचे नोटीसीत म्हटले असून, पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या निर्देशानुसार ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले तसेच सात दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटिसमध्ये देण्यात आल्याने नगराध्यक्षांसह नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलावर लटकत आहे.