विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे. या चार जागांवरील आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने ही घोषणा केली.
१० जून रोजी ही निवडणूक होणार असून, १० मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तसंच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे असणार आहे. तर १३ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ
गेल्या निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस हे निवडून आले होते. त्यावेळी एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. विलास पोतनीस यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी निरंजन डावखरे यांनी ही निवडणूक जिंकली.
मुंबई शिक्षक मतदारसंघ
मुंबई शिक्षक मतदारसंघ लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवारांची अर्ज भरला होता. त्यावेळी कपिल पाटील हे निवडून आले होते.
नाशिक शिक्षक मतदारसंघ
नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दरडे, आघाडी पुरस्कृत संदीप बेंडसे, भाऊसाहेब कचरे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत किशोर दराडे यांनी बाजी मारली होती.