जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच, किरकोळ वादातून पुन्हा खून, दोन गंभीर
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ३ जून सोमवार रोजी जळगाव शहरातील नाथवाडा परिसरातील सिंधी कॉलनीत रस्त्यावरच तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ४ जून मंगळवार रोजी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे दुचाकी लावण्याच्या किरकोळ वादातून तरुणाची चॉपर ने हल्ला करून तरुणाचा खून केल्याची घटना घडली. यात आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सय्यद आरिफ सय्यद समदअली वय २८ वर्ष. या कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाचे गावातीलच काही लोकांसोबत वाद होते. मंगळवार दि. ४ जून रोजी दुपारी त्याने दीड वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात त्याची दुचाकी लावली होती. त्याचवेळी जुना वाद असलेल्या व्यक्तीने देखील त्याच्या दुचाकीजवळ दुचाकी लावली. यामधूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व या शाब्दिक वादाचे रूपांतर मोठ्या विकोपाला गेल्यानंतर एकाने सय्यद आरिफ या तरुणावर चॉपरने तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यात सय्यद आरिफ याच्या छातीत चॉपर घुसल्याने तो खाली कोसळला.
तर त्याच्या सोबत असलेल्या आकिब अली कमर अली. वय-२२ वर्ष. याच्या गळ्यावर, उजव्या हातावर व मुश्ताक अली सय्यद ,वय-५० वर्ष. दोन्ही रा. वरणगाव. यांच्या डोक्यावर वार करण्यात आले.
यात तिघेही जबर जखमी झाले. तिघांना लागलीच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सय्यद आरिफ याला मयत घोषित करण्यात आले. तर आकिब व मुश्ताक अली यांच्यावर उपचार सुरु आहेत. मयत आरिफ याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.या घटनेची वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.