गोव्यात जत्रेत चेंगराचेंगरी, ७ जणांचा जागीच मृत्यू, ७० हून अधिक जखमी
गोवा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गोव्यातील शिरगाव येथे आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान आज पहाटे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून आणि ७० हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींचा प्रकृती चिंताजनक आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील श्री लैराई जत्रेच सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते, त्यावेळी पहाटे ३ वाजता मंदीर परिसरात प्रचंड गर्दी होती, त्यावेळी गोंधळ उडाला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम रुग्णालयाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले.
लैराई देवी ही एक देवी आहे, दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात या देवीची पूजा केली जाते. लैराई देवीला समर्पित मंदिर हे स्थानिक लोकांसाठी आणि जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे. लैराई देवी ‘जत्रा’, जिला शिरगाव जत्रा म्हणूनही ओळखली जाते. हा गोव्यातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, जो दरवर्षी बिचोलिम तालुक्यातील शिरगाव गावात साजरा केला जातो. ही जत्रा हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यात भरते आणि अनेक दिवस चालते. या उत्सवाचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अग्नीवर चालण्याची परंपरा, ज्यामध्ये “धोंड” नावाचे भक्त जळत्या अग्नीवर अनवाणी चालतात. हा विधी त्यांच्या श्रद्धेचे आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक आहे
या उत्सवादरम्यान देवीची भव्य मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये मंत्रोच्चार, ढोल वाजवणे आणि प्रसाद वाटला जातो. या धार्मिक विधीत सहभागी होण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटक येतात. शिरगावची ‘जत्रा’ ही केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर गोव्याच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणारा एक भव्य कार्यक्रम आहे. त्यामुळे या जत्रेला खूप महत्व आहे.