आदित्य ठाकरेंचा टीका केल्याशिवाय दौरा होऊ शकत नाही; शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न त्यांना आवडलेला नाही; गुलाबरावांचा हल्लाबोल
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : आदित्य ठाकरे यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी दौरा केला असावा. त्यांच्या दौऱ्यात टीका केल्याशिवाय दुसरं कामच होऊ शकत नाही. आम्ही जो प्रयत्न केलेला आहे तो शिवसेना वाचवण्यासाठी केला आहे. तो प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला दिसत नाही, असा टोला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेवरही त्यांनी हल्ला चढवला.
हे भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. आदित्य ठाकरे यांनी याकडे त्याच नजरेने बघावं. सर्वात आधी मी पक्षातून फुटलो नव्हतो. ३२ आमदार फुटल्यानंतर आधी मी उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांच्यासमोर आमदारांचं म्हणणं मांडलं. काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे मला इतर आमदारांसोबत जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्धामध्ये तह केले. उद्धव ठाकरे यांनीही तह केला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा हल्ला त्यांनी चढवला.
आज जे आदित्य ठाकरे करत आहेत, तेच त्यांनी करावं हे आम्ही आधी सांगत होतो. अडीच वर्षापूर्वी जर ते फिरले असते तर ही वेळ आली नसती. आम्ही तेव्हा हेच सांगत होतो. ते आज करत आहेत. ते 32 वर्षाचे तरुण आहेत. त्यांनी राज्यभर फिरायला हवं होतं. आमची हीच अपेक्षा होती. ती ते आता पूर्ण करत आहेत. देव त्यांचं भलं करो, असा टोला त्यांनी लगावला. ज्या एकनाथ खडसेंनी युती तोडली तुम्ही त्यांच्यासोबत बसता. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपाशी युती केली मग आम्ही गद्दार कसे? आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत, असंही ते म्हणाले.