शिर्डीतून एक दहशतवादी ATS च्या ताब्यात; नागरिकांमध्ये खळबळ
शिर्डी,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पंजाब राज्यातील पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्याला पंजाब आणी महाराष्ट्र ATS पथकाने शिर्डीतील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतले आहे. शिर्डीत दहशतवादी सापडल्याने खळबळ उडाली आहे.
पंजाब राज्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीखाली स्फोटके ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रविंदर नामक दहशतवाद्याला महाराष्ट्र आणी पंजाब एटीएसने संयुक्त कारवाई करत शिर्डीतील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतलं आहे. मध्यरात्रीनंतर पथकाने शिर्डीतील पिंपळवाडी रोडलगत असणाऱ्या हाॅटेल गंगा येथून रविंदर यास ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे शिर्डी पोलिसांना या कारवाईबाबत कुठलीही माहिती नव्हती. आज सकाळी एटीएस पथकाने शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी रविंदर यास ताब्यात घेतल्याची नोंद केली आणि त्यास पंजाबकडे घेऊन निघाले आहेत.
दरम्यान या घटनेमुळे शिर्डीत खळबळ उडाली असून एखाद्या दहशतवाद्याला शिर्डीतील हाॅटेलमध्ये रूम कशी दिली गेली? बनावट नावाने त्याने रूम घेतली होती का? असेल तर हाॅटेलमध्ये एकट्याला रूम कशी देण्यात आली? शिर्डी पोलिसांचे शहरातील हाॅटेल लाॅजवर नियंत्रण नाही का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.