भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

नारायण राणेंना रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे : अंगात चुडैल घुसली की काय ? गुलाबराव पाटलांचा राणेंवर जोरदार हल्ला

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्या कानाखाली लावण्यासंदर्भात  केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या बाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे, मात्र हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे, अशी टीका शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय, असं गुलाबराव म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना ‘मी असतो तर त्यांच्या कानात लगावली असती’ असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “मला वाटतं नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री…ज्यांनी ही पदं भोगली आहेत, या पदाची गनिमा त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे,” असा जोरदार घणाघात मंत्री पाटील यांनी केला आहे.

नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख हेसुद्धा प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळीही विरोधी पक्ष होते, त्यावेळी त्यांच्याकडे एक गरिमा होती. परंतु आता गरिमा नसलेले भूत येथे आलं आहे. मला तर वाटते यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय ? असा प्रकार मला वाटतो. यांना भानुमतीच्या भक्ताकडे नेलं पाहिजे आणि यांच्या अंगात काय घुसलंय पाहायला पाहिजे, अशी बोचरी टीका ना.गुलाबराव पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांची माफी मागण्याचीही लायकी राणे यांची नाही, बोलताना आपण काय बोलतो याचा त्यांनी विचार करावा, कामाच्या बाबतीत टीका जरुर करावी, सरकारच्या अपयशाबद्दल भूमिका मांडावी, पण काय बोलावं, हे शिकवायचं असेल, तर नारायण राणेंची मला कीव येते, असं गुलाबराव म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!