भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमधुळे

धक्कादायक : दुधात आढळले मृतदेह जतन करणारे घातक ‘फॉर्मालिन’ केमिकल्स

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |राज्यातून एक अत्यंत  खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात घडला. धुळे जिल्ह्यातील करवंद गावातील एका महिलेने विकत घेतलेल्या दुधाच्या नमुन्यात मृतदेह जतन करण्यासाठी वापरले जाणारे ‘फॉर्मालिन’ हे घातक रसायन आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला असून नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे दूध विक्री आणि अन्नसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील करवंद गावात उघडकीस आला प्रकार
धुळे जिल्ह्यातील करवंद गावातील लक्ष्मीबाई वाघ यांनी स्थानिक विक्रेत्याकडून दूध विकत घेतले होते. दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय आल्यामुळे त्यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने त्या दुधाचा नमुना तपासणीसाठी घेतला.
हा नमुना पुढील तपासणीसाठी संभाजीनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत समोर आलेला अहवाल अत्यंत धक्कादायक होता. या दुधात ‘फॉर्मालिन’ हे रसायन आढळल्याचे स्पष्ट झाले.

प्रयोगशाळा अहवालात धक्कादायक माहिती तपासणीदरम्यान या दुधात म्हशीच्या दुधासाठी आवश्यक असलेले फॅट प्रमाणही कमी असल्याचे स्पष्ट झाले. साधारणपणे म्हशीच्या दुधात किमान ५ टक्के फॅट अपेक्षित असते, मात्र तपासलेल्या नमुन्यात ते केवळ ४.३ टक्के आढळले. सर्वात गंभीर बाब म्हणजे या दुधात ‘फॉर्मालिन’ चाचणी पॉझिटिव्ह आली असून दुधात जाणीवपूर्वक घातक रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले आहे.

नेमका फॉर्मालिनचा वापर कशासाठी?
फॉर्मालिन हे अत्यंत घातक रासायनिक द्रावण असून त्याचा वापर प्रामुख्याने औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. हॉस्पिटल किंवा प्रयोगशाळांमध्ये मृतदेह किंवा प्राण्यांचे अवयव सडू नयेत म्हणून ते फॉर्मालिनच्या द्रावणात ठेवले जातात. याशिवाय जंतुनाशक म्हणून, शस्त्रक्रिया कक्ष निर्जंतुक करण्यासाठी तसेच रबर, रंग आणि कापड उद्योगातही या रसायनाचा वापर केला जातो.

दूध खराब होऊ नये म्हणून भेसळ
तज्ज्ञांच्या मते, काही विक्रेते उन्हाळ्यात किंवा लांब प्रवासादरम्यान दूध खराब होऊ नये म्हणून त्यात फॉर्मालिन मिसळतात. या रसायनामुळे दुधातील जिवाणूंची वाढ थांबते आणि दूध दीर्घकाळ खराब होत नाही. त्यामुळे दूध दोन ते तीन दिवस बाहेर ठेवले तरी ते ताजे असल्यासारखे दिसते आणि फुटत नाही. मात्र अशी भेसळ आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

काय होतो आरोग्यावर परिणाम?
फॉर्मालिन हे मानवी शरीरासाठी ‘कार्सिनोजेनिक’ म्हणजेच कर्करोग निर्माण करणारे रसायन आहे. यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारखे तात्काळ त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा रसायनयुक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्यास मूत्रपिंड निकामी होणे, रक्ताचा कर्करोग तसेच पचनसंस्थेचे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!