क्राईमनाशिकमहाराष्ट्र

धक्कादायक : पाेलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे उघडकीस आली. नाशिक मधील पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर थेट हल्ला झाल्याने पंचवटीत खळबळ उडाली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अभिमान नेमाणे हे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करून रात्री १० वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरून घरी जात होते. वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात दोन मद्यपी रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे नेमाणे यांना दिसले. यावेळी नेमाणे यांनी त्यांना हटकले. याचा राग अनावर झाल्याने मद्यपींनी दगडाने नेमाने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस अधिकार्‍यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या पूर्वी पंचवटी परिसरातील दिंडोरी नाक्यावर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकी संजय जाधव ऊर्फ गटया (रा. अवधूत वाडी, पंचवटी) हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. यावेळी गुन्हे शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७, रा. धात्रक फाटा, पंचवटी) हे त्याच रस्त्याने घरी जात होते.

त्यांनी नागरिकांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संशयितांकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, गट्याने थेट चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसल्याची घटना घडली होती. आता थेट पोलीस अधिकार्‍यावरच प्राणघातक हल्ला झाल्याने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काही ठोस भूमिका घेणार की हातावर हात ठेवून गप्प बसणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!