धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या पाकीटात मेलेली पाल सापडल्याने खळबळ
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l शाळेत चिमुकल्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातील मसाल्याच्या पाकिटामध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात घडल्याने चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी दुपारी अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथील वरिष्ठ प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आजार बनविण्याचे काम सुरू होते. यावेळी मदतनीस यांनी शालेय पोषण आहारातील खिचडी बनविण्यासाठी कांदा-लसून मसाल्याचे पाकीट फोडले. या पाकिटातील मसाला पाहताच मदतनीस यांना त्यात मेलेली पाल पाहून मोठा धक्काच बसला. त्यांनी लागलीच
याची माहिती मुख्याध्यापकांना दिली. मुख्याध्यापकांनी घडलेला प्रकार गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळवला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेऊन पंचनाम केला.
हा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. घडलेल्या प्रकरणी शिक्षण विभागाकडून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शालेय पोषण आहाराच्या पुरवठाधाराचा करारनामा पुणे येथील शिक्षण संचालकांनी केला आहे. या बाबत विभागाकडून सांगण्यात आले की, या प्रकरणी पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू असून शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.