धक्कादायक : पोषण आहारा मध्ये मृत चिमणी आढळल्याने खळबळ
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोषण आहारात मृत चिमणी आढळल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही घटना नागपूर मधील असून पोषण आहार पुरवठा धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात पोषण आहारामध्ये चिमणी आढळली आहे. नागपूरात पारशिवानी तालुक्यातील घाट रोहना गट ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. लहान मुलांच्या आहारात मृत चिमणी आढळल्याने खळबळ उडाली आहे. निल नेहाल शिंदेकर यांच्या घरी देण्यात आलेल्या पोषण आहारात ही मृत चिमणी आढळली आहे. ० ते ३ वयोगटातील मुलांना हा पोषण आहार दिला जात होता. मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा सकस असावा असं धोरण असताना हे असलं अन्नधान्य देऊन मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्षाने ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात देखील अशाचप्रकारची घटना घडली आहे. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मुगडाळ यांना कीडे आणि आळ्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे. बहुळ ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेत येऊन पाहणी देखील केली.