पाच दहशतवाद्यांना पुलवामा मध्ये अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
श्रीनगर,वृत्तसंस्था। पुलवामा पोलीस दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांचा तपास करताना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या सक्रिय सहकार्यांचे नेटवर्क उघड झाले आहे. पोलिसांनी तपासादरम्यान पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे.
शौकत इस्लाम डार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशी त्यांची नावे असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. हे मॉड्यूल स्लीपर सेल म्हणून काम करत होते. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी तसंच वाहतुकीमध्ये गुंतले होते, असे प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे.
अटक करण्यात आलेले दहशतवादी त्यांच्या पाकिस्तानी सल्लागाऱ्यांच्या सांगण्यावरून सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक ग्रेनेड हल्ल्यांमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी काकापोरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर मुदासीर वागे ठार झाला. तो कुलगाममधील मालवानचा रहिवासी होता.