नशिराबादहून जळगाव – संभाजीनगर द्रुतगती महामार्गाचे संकेत ; प्राथमिक अभ्यास सुरू
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज, डॉ. दिपक लोखंडे | जळगाव- संभाजीनगर द्रुतगती महामार्गाची सुरुवात जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद परिसरातून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक टप्प्यात असून महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तांत्रिक अभ्यास आणि सर्वेक्षणाच्या आधारे या महामार्गाचा अंतिम मार्ग निश्चित केला जाणार आहे. प्राथमिक तांत्रिक आराखड्यानुसार जळगाव शहरालगतच्या नशिराबाद परिसरातून या द्रुतगती महामार्गाची सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या संभाव्य मार्गामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच शेतकरी वर्गामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. द्रुतगती महामार्गामुळे जळगाव ते संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
तसेच या प्रकल्पामुळे जळगाव शहरासह परिसरातील औद्योगिक क्षेत्रे, व्यापारी व्यवहार आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी अधिक जलद व सोयीस्कर पर्याय उपलब्ध होऊ शकतो. परिणामी खान्देश आणि मराठवाडा या दोन्ही भागांच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रकल्पाचा अंतिम आराखडा आणि महामार्गाचा निश्चित मार्ग तांत्रिक सर्वेक्षण आणि सविस्तर अहवाल पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


