महाराष्ट्रासह देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, ६ संशयित ताब्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली, वृत्तसेवा : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. या संशयित दहशतवाद्यांना महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलंय. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांची नावे ओसामा आणि जिशान अशी आहेत. यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आल्याचेही सांगण्यात येत आहे.
मिळेलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अटक केलेले आरोपी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते. मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस विशेष कक्षाला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.
दिल्ली पोलीस तसे एटीएसने देशातील विविध भागातून एकूण सहा जणांना अटक केले आहे. यामध्ये माहाराष्ट्रात राहणाऱ्या एकाला राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोघांना दिली तेसच तीन जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलंय. या संशयितांच्या टार्गेटवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तसेच दिल्लीमधील काही ठिकाणं होती.