…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ; पुन्हा राज्यात २०१९ ची परिस्थिती
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. तर २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधान सभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या ३ दिवसात जर सरकार स्थापनेसाठी दावा करण्यात आला नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर निर्णय केंद्र सरकारच्या हातात जाऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी राजकीय पक्ष सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
…तर राज्यात पुन्हा २०१९ ची पुनरावृत्ती
२० नोव्हेंबरला राज्यात २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांची आवश्यकता आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल आणि २६ नोव्हेंबरला विधानसभा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्याआधी राज्यात एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीला कोणालाही बहुमत मिळालं नाही तर विचित्र परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कारण सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ ७२ तास राजकीय पक्षांना मिळणार आहेत. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष आहेत. कोणालाही बहुमत मिळालं नाही तर पुन्हा राजकीय समिकरणं बदलतील. पण ३ दिवसात सरकार स्थापन केलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.