‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’, सभापती गोऱ्हेनी गुलाबराव पाटलांना खडसावले
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलेल्या उत्तरावरून समाधान न झाल्याने विधान परिषदेत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. यावेळी मध्येच टेबलावर हात मारून निवेदन करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी खडसावले.
पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आला. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधान परिषदेचं कामकाज सुरू असतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे मुद्दा मांडला. “जर दादागिरी केली जाईल तशी भाषा असेल तर आम्हाला ही उत्तर देता येईल” असं पाटील म्हणाले होते, त्यांच्या या विधानावर दानवे यांनी आक्षेप घेतला आणि पाटील यांनी माफी मागण्याची मागणी केली. त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले की, एका प्रश्नावर शिक्षणमंत्री उत्तर देत होते, पण विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की, एक मंत्री धमकी देत आहे. मी एक कॅबिनेटमधला सहकारी आहे. अनिल परब यांना प्रश्नविचारला त्यांनी उत्तर दिले नाही, असं पाटील म्हणाले.
त्या म्हणाल्या, गुलाबराव आपण खाली बसा. इथे तुमचा काय संबंध आहे?. तुमच्या खात्याशी संबंध नसताना, मी मंत्री होतो. तीथे काय घडले, हे काय सांगत आहात. त्याचा इथे काही संबंध आहे काय?. हे तुमच्या खात्याशी संबंधीत नाही. आपल्याला परवानगी दिली आहे का?. तुम्ही ताबडतोब खाली बसा. ही पध्दत नाही. मी तुम्हाला ताकीद देते. तुमच्या विभागाचा प्रश्न नाही, दीपक केसरकर यांच्या विभागाचा हा प्रश्न आहे. तुम्ही हातवारे करून काय बोलताय, ही सभागृहातली पद्धत नाही. दुसऱ्या मंत्र्यांच्या प्रश्नावर आरोप करायचे. तुम्हाला ताकीद देतंय गुलाबराव…खाली बसा. छातीवर हात देवून काय बोलताय, तुम्ही मंत्री असाल तर घरी, असं म्हणत सभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावले.
गुलाबराव पाटील यांच्या विभागाचा प्रश्न सुद्धा नव्हता, पण त्यांना बोलण्याचं काय कारण आहे? असा सवाल दानवेंनी केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली आणि शब्दांने शब्दाने वाढू नये, अशी विनंती केली.