महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, अमृत स्नान रद्द
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाकुंभाच्या मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरु आहे. सेक्टर 2 मध्ये बांधण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.ही घटना रात्री २ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. तथापि, संगम नदीच्या काठावर अजूनही लोकांची प्रचंड गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगम किनाऱ्यावर कसे तरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन करत आहेत.
अनेक ऋषी-मुनींनीही भाविकांना आपापल्या ठिकाणी राहण्याचे आणि कुठेही न जाण्याचे आवाहन केलं आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.
महाकुंभमेळ्यात जगातील कानाकोपऱ्यातून अनेक लोक येतात. आज नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी होती. त्यामुळे आज १२ ते १३ कोटी भाविक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना घडल्याने अमृत स्नान कार्यक्रम रद्द करण्यात आली आहे. आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नसल्याचे जाहीर केले आहे.सध्या महाकुंभमेळ्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे तर सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे.