विद्यार्थ्यांनी काढली आगळी वेगळी अविस्मरणीय शैक्षणिक सहल
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी ता.भुसावळ जि. जळगाव या शाळेमधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय शैक्षणिक काढली. सहल काढण्याला कारण असे झाले की, वर्गशिक्षक समाधान जाधव यांच्याकडे इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता चौथीपर्यंत सर्व विद्यार्थी एकत्र सोबत शिकत आहे. परंतु एप्रिल २०२४ नंतर हे सर्व विद्यार्थी इयत्ता पाचवी पासून पुढील शिक्षणासाठी वर्गशिक्षक समाधान जाधव यांना आणि जिल्हा परिषद शाळा सोडून जाणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आनंद घ्यावा आणि वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कायम आठवण राहावी यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहल काढण्याचे ठरविले.
यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी शंभर रुपये जमा केले आणि वर्गातीलच अंकिता धनराज पाटील या विद्यार्थिनींची रिक्षा ठरवून रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी गोडेगाव साई मंदिर,नागेश्वर मंदिर वरणगाव, साडेतीन शक्तीपीठ मंदिर वरणगाव,साई मंदिर तळवेल, ऑडनस फॅक्टरी वरणगाव, संत मुक्ताईसागर हतनुर धरण,चिंचोली बालमहाराज आश्रम, मेहूण मुक्ताई मंदिर, चांगदेव तापी पूर्णा नदी संगम, चांगदेव महाराज मंदिर, श्रीकृष्ण मंदिर चांगदेव, कोथळी संत मुक्ताबाई जुने मंदिर, हरताळा श्रीकृष्ण मंदिर आणि तलाव, शिरसाळा हनुमान मंदिर, या सर्व ठिकाणी जाऊन सर्व प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटला. सोबतच चांगदेव येथे बोट मध्ये बसून तापी पूर्णा नदीचा संगम पाहिला. सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती जाणून घेतली. त्यासोबतच साईमंदिर तळवेल, ऑडनस फॅक्टरी वरणगाव, कोथळी येथील गार्डन मध्ये जाऊन झोका, घसरगुंडी, सिसॉ, अशा अनेक खेळण्यांसोबत खेळ खेळून आनंद लुटून अविस्मरणीय सहल संपन्न केली. या सहलीचे गावातील ग्रामस्थ पालक यांनी भरभरून कौतुक केले .