दारू पिऊन जळगाव मध्ये धिंगाणा घालणाऱ्या “त्या” मुक्ताईनगरच्या पोलिसाचे अखेर निलंबन
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l दि. २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी जळगाव येथील भास्कर मार्केट परिसरातील बियर बार मध्ये व बाहेर दारू पिऊन दारूच्या नशेत वाद घालणाऱ्या व दारूच्या नशेत बेजबाबदार पणाने कार चालवणाऱ्या मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘लखपती दीदी’ मेळाव्याचे रविवार रोजी जळगाव मध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी बंदोबस्ताला जिल्हाभरातून पोलीस दल दाखल झाले होते. यात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नेमणूक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल गणवेशातच संदीप धनगर हे रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये आले. त्यांनी वर जॅकेटही घातले होते. यावेळी संदीप धनगर यांना मद्यपान जास्त झाल्याने त्यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचेच दोन पोलिस आवरण्यासाठी आले होते.
शेवटी संदीप धनगर यांनी नशेतच क्र. एमएच ०२, ईएच १०४८ च्या कार मध्ये बसून ही कार कशीतरी काढून रस्त्यावर न थांबता बेजबाबदार पणाने भरघाव वेगाने कार चालविली. यात सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. हा सर्व प्रकार बियरबार सह आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
या घटनेची दखल घेत चौकशी करून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मुक्ताईनगरचे कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना गणवेशात मद्यपान करून सार्वजनिक जागी गैरवर्तन केल्याबाबत निलंबित केले आहे. तसेच, त्यांना मुख्यालयी जमा करण्याचे आदेश सोमवार दि. २६ रोजी संध्याकाळी देऊन पुढील चौकशी करण्याचे संबंधित विभागाला निर्देशित केले आहे.