भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

राज्यात पुन्हा एकदा ‘तेलगी’ पॅटर्न? : बनावट पोस्टल स्टॅम्प विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून त्यांची विविध राज्यांमध्ये विक्री करणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग (मा.रा.आ.) पोलिसांनी यशस्वीरित्या पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी बिहार आणि दिल्ली येथून मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प हस्तगत केले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून,बी१२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई जी.पी.ओ.चे डाक निरीक्षक आशुतोष जमादारसिंह कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मा.रा.आ. मार्ग पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि मुंबई जी.पी.ओ. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही टोळी बनावट स्टॅम्पची छपाई करून ते देशभर वितरित करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ७ ते ८ कोटी रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल आढळून आली आहे. या मोठ्या रक्कमेवरून हा गैरप्रकार किती व्यापक स्तरावर सुरू होता हे स्पष्ट झाले असून, पोलिस आता या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी १४ दिवस दिल्लीत  पाळत ठेवली
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, मात्र अटकेच्या भीतीने आरोपी सातत्याने आपले मोबाईल क्रमांक आणि वास्तव्याचे ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर, पोलिस पथकाने दिल्लीत सलग तब्बल १४ दिवस पाळत ठेवून अत्यंत गोपनीयरीत्या कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून २७ लाख ८४ हजार २०० रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले असून, हे आरोपी कुरिअरमार्फत विविध राज्यांत बनावट स्टॅम्प पाठवून शासनाची मोठी फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मोठ्या कारवाईमुळे आणि गुन्ह्याच्या स्वरूपामुळे पुन्हा एकदा देशभरात गाजलेल्या तेलगी स्टँप घोटाळ्याची आठवण ताजी झाली आहे.

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | या पूर्वी बनावट स्टॅम्प घोटाळ्याचे तेलगीप्रकरण चांगलेच गाजले होते. या तेलगी प्रकरणानंतर सरकारी दस्ताऐवज वापरण्यात येणाऱ्या स्टॅम्पमध्ये काही सुधारणा देखील करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही स्टॅम्पचा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. नकली पोस्टल स्टॅम्प बनवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील आरोपींना पोलिसांनी बिहार आणि दिल्लीमधून अटक केली आहे. या बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणी मुंबईतील राकेश बिंद, बिहारमधील शमशोद्दीन गफार व शाहिद रजा तसेच दिल्लीतील मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि गाझियाबाद येथील विरेंदर प्रसाद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!